ऐकू कमी येतं? ऐकू कमी येणाऱ्या आजोबांचं किंवा आजींची व्यथा खरं तर खूप मोठी, पण इतरांना पटकन न जाणवणारी! घरात जेवताना सुरू असलेल्या गप्पा असोत
ऐकू कमी येणाऱ्या आजोबांचं किंवा आजींची व्यथा खरं तर खूप मोठी, पण इतरांना पटकन न जाणवणारी! घरात जेवताना सुरू असलेल्या गप्पा असोत किंवा सर्वानी एकत्र बसून टीव्ही पाहणं असो. सगळे कुटुंबीय घेत असलेल्या गोष्टीचा आनंद त्यांना घेता येत नाही. कुणाशी बोलायचं तर समोरच्याला त्यांच्याशी ओरडून बोलावं लागतं. या सगळ्या अनुभवांमधून हे आजी-आजोबा कुणाशी बोलणं टाळू लागतात, एकेकटं राहू लागतात. श्रवणशक्तीचा ऱ्हास मुळात होतोच का, त्यावर उपाय आहेत का, श्रवणयंत्राचा होणारा त्रास कमी करण्यासाठी काही आधुनिक पर्याय आहेत का, याविषयी जाणून घेऊ या-
‘आजूबाजूचे सर्वजण फार भरभर आणि तोंडातल्या तोंडात बोलतात, त्यामुळे ते काय बोलतात हे कळत नाही,’ अशी तक्रार ऐकण्याची तक्रार असलेले वृद्ध लोक नेहमी करतात. वास्तविक मागील कित्येक वर्षे ही वृद्ध मंडळी त्याच व्यक्तींच्या सहवासात असतात आणि इतकी र्वष ते सगळे भरभर किंवा पुटपुटत बोलतात हे त्यांना जाणवलेलं नसतं.
उतारवयात माणसाची विविध गात्रं शिथिल होऊ लागतात. त्यापैकी डोळ्यांची क्षीणता चाळिशीपासूनच जाणवायला सुरुवात होते आणि दृष्टीची तीव्रता कमी कमी होण्यास सुरुवात होते. ऐकण्याची शक्ती क्षीण होण्याची प्रक्रियाही चाळिसाव्या वर्षांपासूनच सुरू झालेली असली तरी त्या क्षीणतेची तीव्रता मात्र साधारणपणे साठीनंतर जाणवू लागते.
कानाची ऐकण्याची प्रक्रिया ‘कॉक्लिया’ म्हणजे ‘अंतकर्ण’ आणि नसा याद्वारे घडते. उतारवयात निर्माण होणारी श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या कॉक्लिया आणि नसा या दोहोंनाही होणाऱ्या कमी रक्तपुरवठय़ामुळे सुरू होते. कॉक्लियाला होणारा रक्तपुरवठा ज्या केशवाहिन्यांमार्फत होतो त्या वाढत्या वयाबरोबर अरुंद होत जातात. त्यामुळे कॉक्लियाचा आणि नसांचा काही भाग निर्जीव होतो आणि श्रवणाची ग्रहणशक्ती कमी होते.
अंतकर्ण आणि मेंदू या दोहोंच्या सहकार्याने शब्दाशब्दांमध्ये फरक केला जातो आणि नेमका कोणता शब्द ऐकला हे त्या व्यक्तीस कळतं. अंतकर्ण निर्जीव होत गेल्यामुळे ही ‘स्पीच डिस्क्रिमिनेशन पॉवर’ मंदावते आणि समोरचा माणूस काहीतर बोलला एवढं कळलं तरी तो काय बोलला ते नीटसं कळत नाही.
श्रवणयंत्र केव्हा?
वृद्धत्वामुळे श्रवणशक्ती कमी होते तेव्हा साधारणपणे ती दोन्ही कानांची सारखीच कमी होते. अशा वेळी श्रवणयंत्र हा पर्याय असू शकतो. श्रवणयंत्राची गरज ओळखण्यासाठी स्वत:च करून पाहण्याची एक अगदी ढोबळ चाचणी आहे. घरात सर्वजण एकत्र टीव्ही पाहात असताना घरातल्या वृद्ध व्यक्तीलाही टीव्हीचा आनंद घ्यायचा आहे अशी कल्पना करा. त्याने स्वत:साठी टीव्हीचा आवाज वाढवल्यावर इतरांना टीव्ही कर्कश ऐकू येऊ लागला किंवा त्या वृद्ध व्यक्तीशी बोलताना इतरांना कंठशोष करावा लागू लागला की श्रवणयंत्राची गरज निर्माण झाली आहे असं समजावं. पण ज्यांना कुटुंबात किंवा समाजात फार मिसळलं नाही तरी चालतं किंवा ऐकू आलं नाही तरी ज्यांचं फारसं काही अडणार नसतं अशांना श्रवणदोष असूनही कदाचित श्रवणयंत्राची गरज भासणार नाही. श्रवणयंत्र वापरण्याकडे असलेला व्यक्तींचा कल यावरूनही ठरतो. श्रवणशक्ती किती कमी झाली आहे हे पाहण्यासाठी ‘ऑडिओमेट्री’ या चाचणीबरोबरच ‘स्पीच डिस्क्रिमिनेशन स्कोअर’ ही चाचणीही केली जाते. ज्याचा स्पीच डिस्क्रिमिनेशन स्कोअर कमी प्रतीचा येतो त्या व्यक्तीने शक्यतो श्रवणयंत्र वापरावं.
श्रवणयंत्रं- जुनी आणि नवी
पूर्वीच्या काळी ‘अॅनालॉग’ प्रकारची श्रवणयंत्रं उपलब्ध होती. त्यात सर्व प्रकारचे आवाज काही ठरावीक पट वाढवले जायचे. त्यामुळे ही यंत्रे वापरताना बोललेलं ऐकण्याबरोबरच स्वयंपाकघरात भांडं खाली पडल्यावर ठण्कन येणाऱ्या आवाजासारखे इतर आवाजही मोठे ऐकू येत. आता वापरल्या जाणाऱ्या ‘डिजिटल’ श्रवणयंत्रांचं ‘प्रोग्रॅमिंग’ करता येतं त्यामुळे नको असलेले आवाज काही प्रमाणात कमी करता येतात आणि श्रवणयंत्र सुसह्य़ बनतं.
ऐकू कमी येण्याची वेगवेगळी कारणं
* कानात ‘व्ॉक्स’ किंवा मळ साठला असेल तर कोणत्याही वयात ऐकायला कमी येण्याची तक्रार दिसते.
* आतल्या कानातल्या केशवाहिन्यांचा ऐकण्याशी संबंध असतो. वृद्धापकाळात या केशवाहिन्या नष्ट होत जातात आणि त्यांची पुन्हा वाढ होत नाही. या प्रक्रियेत झालेली श्रवणशक्तीची हानी कायमची आणि वाढत जाणारी असते.
* सतत मोठय़ा आवाजाचा संपर्क एअरपोर्ट, बस स्थानकं किंवा कारखान्यांमध्ये काम करणारे लोक, संगीतकार यांच्यात या कारणामुळे ऐकू येणं कमी होण्याची समस्या असू शकते.
* ऐकू न येण्यात आनुवंशिक कारणंही असू शकतात.
* मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा काही आजारांमध्ये रक्तवाहिन्या अरुंद होतात. अशा आजारांचा संबंध श्रवणशक्ती कमी होण्याशी असू शकतो.
* धूम्रपानाचं व्यसन असणाऱ्यांमध्ये ऐकू न येण्याची तक्रार लवकर सुरू होऊ शकते.
* अनेक वृद्ध मंडळींना विविध औषधं सुरू असतात. ‘अमायनो ग्लायकोसाईडस्’ या गटातील ‘स्ट्रेप्टोमायसिन’, जेंटामायसिन’ ही प्रतिजैविकं तसंच ‘लॅसिक्स’सारखं ‘डाययुरेटिक’ म्हणजे लघवीकारक औषध अशी काही औषधंही श्रवणशक्तीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकतात.
* आतल्या कानात वृद्धापकाळामुळे घडणारे बदल थांबवता येणार नाहीत. पण इतर काही कारणांमुळे होणारा श्रवणशक्तीचा ऱ्हास टाळण्यासाठी आधीपासून प्रयत्न करता येतील. कर्कश आवाजांशी सततचा संपर्क शक्यतो टाळणं, आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणं, धूम्रपान टाळणं या गोष्टी तरी आपण नक्कीच करू शकतो.
श्रवणयंत्राकडे सकारात्मकतेनं पाहायला हवं
श्रवणयंत्र ऐकण्यासाठी मदत करणारं साधन आहे, पण ते वापरलं म्हणजे ऐकू येण्याची समस्या शंभर टक्के सुटते असं नाही. श्रवणयंत्र वापरताना काही अडचणी येतात हे खरं असलं तरी त्यावर आता नवीन तंत्रज्ञानाद्वारे काही प्रमाणात मात करता आली आहे.
श्रवणयंत्रात गोंगाट कमी करण्याची जी यंत्रणा असते त्याला ‘चॅनल’ किंवा ‘फिल्टर’ असं म्हणतात. अगदी २ चॅनलपासून ४८ चॅनलपर्यंतची श्रवणयंत्रं अलीकडे उपलब्ध झाली आहेत. ऐकू येणारा बोलण्याचा आवाज वाढवणं आणि इतर गोंगाट कमी करणं असा या यंत्रणेचा उद्देश असतो. पण श्रवणयंत्र लावलेली व्यक्ती दुसऱ्याशी बोलत असेल आणि त्यांच्या बाजूला इतर काही माणसं बोलत असतील तर आवाजांचा गोंधळ ऐकू येऊ शकतो. आधुनिकतेबरोबर श्रवणयंत्रांचे आकारही लहान होत गेले आहेत. श्रवणयंत्र लावलेलं पटकन समोरच्याच्या लक्षात येणार नाही इतकी सुधारणा नक्कीच झाली आहे. ही समस्या पूर्णपणे सोडवता येत नसली तरी ती कमी करता येऊ शकते.
श्रवणयंत्रांच्या किमती साधारणत: १० हजारांपासून सुरू होतात. श्रवणयंत्र इलेक्ट्रॉनिक गॅजेट असल्याने त्याला बॅटरी लागते. ही बॅटरी १५-२० दिवसांनी बदलावी लागते. प्रत्येक वेळी या बॅटरीसाठी सुमारे ३०-३५ रुपये खर्च करणं अनेकांना नको वाटतं. या सर्व कारणांमुळे श्रवणयंत्राची गरज भासणाऱ्या व्यक्तींची मानसिकता त्यासाठी तयार करावी लागते. श्रवणयंत्राने काय आणि किती प्रमाणात साध्य होऊ शकेल याकडे सकारात्मकतेनं बघायला हवं.
0 Comments